राजभवनाकडून खुलासा प्रसिद्ध, राज्यपाल अनुपस्थितीची दिली होती पूर्वकल्पना

सोमवार, 25 जानेवारी 2021 (22:34 IST)
मुंबईत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून देण्यात येणारे निवेदन स्वीकारण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित नसल्याने शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला. राज्यपालांनी वेळ देऊनही भेट नाकारल्याचा आरोप केला. मात्र राजभवनातून शेतकरी नेत्यांना पाठवण्यात आलेले एक पत्र समोर आले आहे. यात गोव्याच्या विधानसभेच्या सत्राला संबोधित करण्यासाठी राज्यपाल गोव्यात गेले असल्याने ते निवेदन स्वीकारण्यासाठी अनुपस्थिती असतील, असे राजभवनाकडून आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या खुलाशात म्हटले आहे.
 
याबाबत राज भवनाकडून देण्यात आलेल्या खुलाशात म्हटले आहे की, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांचेकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिर‍िक्त कार्यभार आहे. दिनांक २५ जानेवारी रोजी ते गोवा विधान सभेच्या प्रथम सत्राला  संबोध‍ित करणार असल्याने राज्यपाल महोदय त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास  भेटू शकणार नाहीत, असे राज भवनातून अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते.  
 
संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनजंय शिंदे (9867693588)यांना दिंनांक २२ जानेवारी रोजी दूरध्वनीद्वारे तसेच निमंत्रक प्रकाश रेड्डी यांना दिनांक २४ जानेवारी रोजी लेखी पत्राव्दारे राज्यपालांच्या अनुपलब्धते बददल कळविण्यात आले होते.  शिंदे यांनी व्हॉटसॲप संदेशाव्दारे निरोप मिळाल्याचे मान्य केले होते. तसेच प्रकाश रेडडी यांना या बाबतचे लेखी पत्र दिनांक २४ जानेवारी रोजी प्राप्त झाले  होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला  भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे वृत्त चुकीचे आहे असे राज भवनातून स्पष्ट करण्यात येत आहे, असे राज भवनाकडून पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती