नाशिकमधील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या कळसाकडील भागाच्या जिर्णोद्धार करण्याचे काम सुरु आहे. त्या कामाला आता वेग आला आहे. मंदिराच्या कळसाच्या बाजूचे अचानक दगड निखळल्याने गेल्या काही दिवसांपासून मंदिरात पावसाचे पाणी झिरपत होते. विश्वस्त मंडलेश्वर काळे यांच्या उपस्थितीत या कामाला शुभारंभ करण्यात आला .
साक्षात भगवान शंकर महादेवांनी त्यांच्या लाडक्या नंदीसह वास्तव्य केलेल्या कपालेश्वर महादेव मंदिराला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व असल्याने दर्शनासाठी बारमाही भाविकांची गर्दी होत असते. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे घुमटासह सभागृहामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात झिरपत होते. यामुळे कळसाकडील अनेक दगड निखळले आहेत. त्यामुळे मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा भाग धोकादायक बनल्याचे निदर्शनास आले होते.
त्यानंतर विश्वतांकडून याबाबत विचारविनियम होऊन या कामासाठी निविदा काढण्यात आली. मुंबईस्थित एका अनुभवी कंपनीला हे काम ४० लाख रूपयांत देण्यात आले आहे. संबंधित कंपनीने हे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. या कामामुळे भाविकांच्या दर्शनामध्ये कोणता अडथला येणार नसल्याचे विश्वस्त काळे यांनी सांगितले .