महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता २२ ऑगस्ट रोजी होणार

बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (21:51 IST)
महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. यापूर्वी तीन सुनावण्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही हा संघर्ष कायम आहे. शिवसेना नक्की कुणाची उद्धव ठाकरे यांची की बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची याचा फैसला या सुनावणीत होणार आहे. गेल्या दोन सुनावणीत दोन्ही बाजूने ज्येष्ठ विधीज्ञांनी घमासान युक्तीवाद केला आहे. याप्रकरणी ८ ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र, ही तारीख बदलून १२ ऑगस्ट करण्यात आली. आता पुन्हा ही तारीख बदलण्यात आली आहे. आता ही सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे संगण्यात येत आहे. हा बदल का झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.
 
या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशभराचे लक्ष लागले आहे. अभूतपूर्व राजकीय संकट आणि घडामोडी राज्यात घडल्या. आणि आता शिवसेनेतील मोठी फूट थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे. त्यातच सरन्यायाधीश एस व्ही रमणा हे या महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे आता २२ ऑगस्टला काय होते, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती