नाशिकमधील अमली पदार्थ प्रकरणी पालकमंत्री आक्रमक

सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (22:24 IST)
नाशिक  :- जिल्ह्यात ड्रग्सचे रॅकेट पोलिसांनी उघड केल्यानंतर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शहरातील अवैध धंदेचालकांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. तरुणाईमध्ये ड्रग्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, फक्त कारवाईवर न थांबता जनजागृती करणे देखील महत्त्वाचे असल्याने ना. दादाजी भुसे यांनी ‌‘अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळ‌‘ संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे.
 
या बैठकीत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक व प्रार्थमिक), आरोग्य विभाग अधिकारी, अन्न व प्रशासन विभाग अधिकारी, प्रमुख शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, प्रमुख महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
 
नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आधीच अवैध धंदे चालकांची गय केली जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत.
ना. भुसे यांनी ड्रग्सबाबत काही दिवसापूर्वी माहिती मागवली होती. त्यानुसार शहरात पोलीस कारवाई करण्यात आली. येत्या काही दिवसात अजून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई होईल. अवैध धंदा चालकांना पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा ना. भुसे यांनी दिला. येत्या काही दिवसात विशेष पथकांच्या माध्यमातून इतर अवैध धंद्यांवर देखील टाच आणली जाईल, असे सांगण्यात आले.
 
एका बाजूला पोलिस प्रशासन कारवाई करेलच; मात्र त्याचवेळी समाजात विघातक परिणामांची जनजागृती होणे गरजेचे आहे. जी तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली आहे, त्यांचे समाज परिवर्तन होणे गरजेचे आहे. याला अनुसरून काय उपाययोजना आखणे गरजेचे आहे याचा ऊहापोह आजच्या बैठकीत होणार आहे.
यावेळी नागरिकांनी देखील आपल्या काही सूचना असल्यास लेखी स्वरूपात पालकमंत्री कार्यालयात कळविण्याचे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती