टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोशल मीडियातून नीरज चोप्राचे अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून त्याचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी उद्धव ठाकरेंनी वेळ मागितली असून विधानसभेत बोलावून सन्मानित केले जाणार आहे. मुंबईत त्याचे भव्य स्वागत होणार आहे, अशी माहिती कुटुंबातील सदस्याने दिली.
याचबरोबर, मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो असेही उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचे नीरज चोप्राच्या कुटुंबीयांनी सांगितले. हरयाणातील खांदरा हे नीरज चोप्राचे मूळ गाव आहे. १३ ऑगस्टला नीरज चोप्रा आपल्या गावात येणार आहे. त्यामुळे गावातही सध्या उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी इतिहासात आतापर्यंत झाले नाही, असे सेलिब्रेशन करणार असल्याचे नीरज चोप्राच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. तसेच, कुटुंबीयांनी आपले मराठी कनेक्शनही सांगितले.
नीरज चोप्रा याने टोक्योत सुवर्णपदक जिंकले आणि हरयाणा, दिल्लीत नीरज चोप्रा यांचे अभिनंदन, असे संदेश सुरू झाले. त्याचे कारण पानिपतजवळच्या खंदरा गावचा रहिवासी असलेल्या नीरज चोप्राचे मूळ महाराष्ट्रात आहे. १७६४ च्या तिसऱ्या पानिपत युद्धातून वाचलेले सगळ्या जाती-समाजाचे लोक हरयाणात रोड मराठा म्हणून ओळखले जातात. सोनीपत, पानीपत, कुरूक्षेत्र, कर्नाल, कैथल आणि जिंद या सहा जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने राणे, भोसले, चोपडे, मुळे, महले वगैरे आडनावे असलेला हा समाज राहतो. शेती, दुग्धउत्पादन हा त्यांचा मुख्य व्यवसाय. नीरजचे कुटुंबही शेती व्यवसायातच आहे. २०१५ मध्ये जागतिक ज्युनिअर स्पर्धेत नवा विक्रम नोंदविल्यापासून प्रत्येक मुलाखतीत तो रोड मराठा समाज व कुटुंबांच्या शेती व्यवसायाचा आवर्जून गौरवाने उल्लेख करीत आला आहे.