माजी सैनिकाने राष्ट्रगीतावेळीच सोडले प्राण

बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (07:22 IST)
नाशिक शहरातील सातपूर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एका शाळेत आयोजित कार्यक्रमात माजी सैनिक चंद्रकांत मालुंजकर यांना निमंत्रित करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रम झाले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी राष्ट्रगीत घेण्यात येत होते. मात्र, याचवेळी मालुंजकर यांना हृदयविकाराचा झटका आला. राष्ट्रगीत सुरू असतानाच ते स्टेजवर कोसळले. ही बाब लक्षात घेऊन संबंधितांनी तातडीने त्यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
 
मालुंजकर हे १९६२ च्या युद्धात सहभागी झाले होते. मालुंजकर हे निवृत्तीनंतरही विविध सामाजिक कार्यात सक्रीय होते. त्यासाठीच ते विविध उपक्रम आयोजित करीत असत. देशाप्रती त्यांची निष्ठा मोठी होती. अखेर राष्ट्रगीत सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती