मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावरील मजुरीचा प्रकार समोर आला आहे. टोल कर्मचाऱ्यांना दादागिरी करीत चक्क नाशिकचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांचाच ताफा अडविल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, अधिक्षकांच्या ताफ्याशी टोल कर्मचाऱ्यांनी हुज्जत घातली. याप्रकरणी अखेर टोल नाका कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत टोलनाक्याबाबत सातत्याने तक्रारी येत असतात. त्याची कुठलीही दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व केंद्र सरकारकडून घेतली जात नसल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. लहानसहान तक्रारी दररोज घडत असतात. आता मात्र, मोठा प्रकार या टोलनाक्यावर घडला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांचा ताफा पिंपळगाव बसवंत कडून नाशिकच्या दिशेने येत होता. हा ताफा टोल नाक्याच्या लेन जवळ आल्यानंतर स्वतंत्र लेन बंद असल्याने गाडी दुसऱ्या लेनला गेली, मात्र १५ ते २० मिनिटे होऊनही लेन ओपन होत नसल्याने पोलीस अधीक्षक यांनी याबाबत विचारणा केली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी गाडी जाऊ दिली नाही. कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस अधिक्षकांसह पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत अरेरावी केली. त्यामुळे नाईलाजाने संतापून पोलीस अधीक्षक यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्याआधारे पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.