सिंधुदुर्गातील तिलारी खोऱ्यापर्यंतचे क्षेत्र हे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित

शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (08:20 IST)
सातारा , कोल्हापूर, सिंधुदुर्ग  अशा पश्चिम घाटातील  जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या जांभळीपाड्यापासून सिंधुदुर्गातील  तिलारी खोऱ्यापर्यंतच्या भागामध्ये वाघ आढळून येत आहेत. अशी माहिती वनविभागाला मिळाली आहे. त्याचबरोबर वाघाच्या पावलांच्या खुणा देखील आढळून आल्या आहेत. या पार्श्वभुमीवर जांभळीपाड्यापासून सिंधुदुर्गातील तिलारी खोऱ्यापर्यंतचे क्षेत्र हे व्याघ्र प्रकल्प  म्हणून घोषित करण्यात येणार आहे.
जांभळीपाड्यापासून  सिंधुदुर्गातील तिलारी खोऱ्यापर्यंतच्या या भागातील 67.82 चौरस किमीचे क्षेत्रफळ राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्यातील 11 नवीन वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत. या भागात पट्टेरी वाघ आणि अन्य वन्यजीव वनस्पतींच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कोल्हापूरमधील आजरा, भुदरगड, गगनबावडा या क्षेत्रात 2 संवर्धन क्षेत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. 
कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी पुढे गोवा आणि कर्नाटकातील जंगल असा वाघांच्या संचाराचा मार्ग वसला आहे. येथे जंगल परिसर वाघांसाठी (Tiger Project) पोषक असून, मानवी हस्तक्षेप या परिसरात कमी आहे. तर, सिंधुदुर्ग, चंदगड या क्षेत्रामध्ये हत्तीचा अधिवास असल्यानं राधानगरी अभयारण्याच्या दक्षिण बाजूला हत्ती आणि व्याघ्र प्रजनन केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोयना, चांदोली अभयारण्यासाठी राखीव जागा आणि राधानगरी, तिलारी जंगलाचा परिसर हा टायगर कॉरिडोर (Tiger Corridor) म्हणून ओळखला जातो.
दरम्यान, सावंतवाडी तिलारी राखीव क्षेत्र 30 चौरस किलोमीटर, आंबोली-दोडामार्ग राखीव क्षेत्र 57 चौरस किमी, सातारा वन विभागातील जांभळी वनक्षेत्र 65 चौरस किमी या भागात पक्षी संवर्धन केंद्र उभारले जाणार आहे. तर, विशाळगड येथे 93 चौरस किमी, पन्हाळगड 73 चौरस किमी, चंदगड 225 चौरस किमी ही कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील राखीव भाग आहे. विदर्भ, नागपूर आणि अमरावतीत 3 क्षेत्रे नव्याने विकसित करण्यात येणार आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती