ठाकरे सरकार अडचणीत? काँग्रेसच्या २५ आमदारांचे सोनिया गांधींना पत्र

गुरूवार, 31 मार्च 2022 (08:13 IST)
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे म्हणजेच महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे सरकार आहे. उद्धव ठाकरे हे या सरकारचे प्रमुख म्हणजेच मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून तिन्ही पक्षांमध्ये वादविवादाच्या घटनांचे प्रसंग वारंवार येत आहेत.त्यातच आता काँग्रेस आमदारांनी आपल्या सरकारच्या विरुद्ध नाराजीचा सूर लावला आहे. महाराष्ट्रातील किमान २५ काँग्रेस आमदारांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात तीव्र आघाडी उघडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार आता धोक्यात आले की काय ? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.सरकारमधील मंत्र्यांविरोधात तक्रार करण्यासाठी त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. आपल्याच पक्षाचे मंत्री आपल्या तक्रारीला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. आमदारांनी एका पत्रात सोनिया गांधींना राज्यात या गोष्टी ठीक करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
 
एका वृत्तानुसार, काही आमदारांनी आघाडी सरकारमधील मंत्री, विशेषत: काँग्रेसचे मंत्री त्यांचे ऐकत नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्यापैकी एक जण म्हणाले की, जर अनेक मंत्र्यांनी आमच्या मतदारसंघात कामाची अंमलबजावणी करण्याच्या आमदारांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले, तर निवडणुकीत आमच्या पक्षाची चांगली कामगिरी कशी होईल?पक्षात समन्वयाचा अभाव असल्याचे दर्शवून, ते आमदार म्हणाले की, त्यांना गेल्या आठवड्यातच कळले की प्रत्येक काँग्रेस मंत्र्याला त्यांच्या समस्यांचे योग्य निराकरण करण्यासाठी पक्षाच्या तीन आमदारांना नियुक्त केले आहे.तसेच काँग्रेसचे आणखी एक आमदार म्हणाले, काँग्रेसच्या मंत्र्यांना प्रत्येकी तीन आमदार वाटप करण्यात आल्याचे एच.के. पाटील यांनी नुकतीच बैठक घेतली तेव्हा आम्हाला समजले. उद्धव ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांनी हे करण्यात आले होते. परंतु  आम्हाला याची माहिती सुमारे अडीच वर्षे झाली नाही. आमच्याशी कोणता मंत्री संबंधित आहे हे आजही कोणाला माहीत नाही.उपमुख्यमंत्री अजित पवार नियमितपणे राष्ट्रवादीच्या आमदारांना भेटतात, निधीचे वाटप करतात आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुढे गेला आणि काँग्रेस पक्ष मागे पडल्याचे इतर काँग्रेस आमदारांनी सांगितले.
 
काँग्रेसचे आणखी एक आमदार म्हणाले, राष्ट्रवादी आमच्यावर शाब्दीक हल्ले करत आहे. राष्ट्रवादीच्या मंत्री व आमदारांना अधिक निधी वाटप केले, जर परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रातही काँग्रेस इतर राज्यांप्रमाणेच दुर्लक्षित होईल. आता पंजाबमध्ये पक्षाचा पराभव झाल्यानंतर तातडीने कारवाई करावी, असेही या आमदारांनी सांगितले. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष निष्क्रिय राहिला तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असेही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती