दहावी निकाल : अकरावी 2021-22 वर्षाची प्रक्रिया सुरू

शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (19:36 IST)
राज्यातील SSC बोर्डचा निकाल जाहीर केल्यानंतर आता अकरावीच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 
2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा CET लागू करण्यात आलेली होती. पण अखेरीस ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन दहावीच्या गुणांवरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत, अशी सूचना शिक्षण विभागाने शैक्षणिक संस्थांना दिली आहे.
 
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत.
 
सदर 5 ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत संलग्न आहे. वरील पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.
मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ. 11वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते. न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा दिनांक 14 ऑगस्ट 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.
 
ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. यापुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असं शिक्षण विभागाने म्हटलं आहे.
प्रवेशाकरिता https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन मोबाईल अॅप डाऊनलोड करता येऊ शकेल. तसंच अधिक माहितीसाठी [email protected] या मेल आयडीवर संपर्क साधावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती