नाशिकमध्ये तीन वर्षांनंतर स्वाइन फ्लूचा बळी

शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (20:37 IST)
उपनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेचा स्वाइन फ्लूने बळी घेतला असून तीन वर्षांनंतर शहरातील स्वाइन फ्लूचा हा पहिला बळी आहे. आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय आरोग्य समितीने या मृत्यूची पुष्टी केली आहे. असून ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूचे ४९ रुग्ण आढळले आहेत. वर्षभरात आत्तापर्यंत ७९ रुग्ण सापडले आहेत.
 
कोरोनाचे संकट जात नाही तोच नाशिकमध्ये डेंग्यूपाठोपाठ स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. दुसरीकडे सर्दी-खोकला आणि व्हायरल तापाने नाशिककर त्रस्त आहेत.एप्रिलच्या सुरुवातीला स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण नसताना हळूहळू ही संख्या वेगाने वाढत आहे. जूनमध्ये २, जुलैत २८ इतकी संख्या असताना ऑगस्टच्या १७ दिवसांतच स्वाइन फ्लूबाधितांचा आकडा ४९ वर पोहाेचला आहे. त्यातच वीस दिवसांपूर्वी उपनगरमधील ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेचा मृत्यू २९ जुलै २०२२ रोजी खासगी रुग्णालयात झाला होता. त्यानंतर महिलेच्या रक्ताचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पुण्याला पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून या समितीने या महिलेचा मृत्यू स्वाइन फ्लूनेच झाल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती