पुण्यात स्वाइन फ्लूचे सात रुग्ण व्हेंटिलेटरवर

सोमवार, 19 जून 2017 (08:44 IST)
सध्याचे वातावरण स्वाइन फ्लूच्या वाढीसाठी पोषक असून रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यांत 56 जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. तर, सध्या सात रुग्ण व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
 
आरोग्य खात्यातर्फे 1 जाने ते 17 जून या दरम्यान 73 लाख 6 हजार 405 जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी 299 जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. संशयित असलेल्या 6 हजार 917 जणांना स्वाइन फ्लूची औषधे देण्यात आली. तर, 233 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सहा महिन्यात 56 जणांचा स्वाइन फ्लूच्या आजाराने मृत्यू झाला आहे. तसेच, जूनच्या महिन्याभरात 2 हजार 252 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामधील 30 रुग्णांना टॅमीफ्लूची औषधे देण्यात आली. तर, 10 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. महापालिकेच्या रुग्णालयात 17 जणांचा तर, शहरातील विविध खासगी रुग्णालयात 39 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या 7 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
 
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वाइन फ्लू रोखण्यासाठी विविध उपाययोजना केली जात आहेत. सध्या पावसाळा सुरू झाला असून हे वातावरण विविध आजारांना पोषक असे निर्माण करते. पावसाळ्यात मलेरिया व डेंग्यूची साथ अधिक असते. त्यामुळे या आजाराला आळा घालण्यासाठी आरोग्य खात्याच्या वतीने शहरात कीटकनाशक फवारणी केली जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा