स्वदिच्छा साने प्रकरण : जीवरक्षक मितू सिंहनेच असा घेतला तिचा जीव
शनिवार, 21 जानेवारी 2023 (09:30 IST)
मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत असलेली स्वदिच्छा साने गेल्या अडीच वर्षांपासून बेपत्ता होती. मात्र, ती बेपत्ता नसून तिचा खून झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. बांद्रा बॅण्डस्टँड परिसरात जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या मितू सिंह यानेच स्वदिच्छाचा खून केल्याची कबुली दिली आहे.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या बातमीनुसार, स्वदिच्छाचा खून करून मितू सिंहने तिचा मृतदेह बांद्राच्या समुद्रात फेकून दिला होता, अशी माहिती मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आज याच प्रकरणाची अधिक माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक पत्रकार परिषदही आयोजित केली आहे.
काय आहे प्रकरण?
22 वर्षीय स्वदिच्छा साने ही पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये राहायची. 29 नोव्हेंबर 2020 रोजी ती मुंबईत परीक्षा देण्यासाठी रेल्वेने गेली होती. मात्र, नंतर तिचा आणि कुटुंबीयांचा संपर्क तुटला होता.
29 नोव्हेंबर रोजी स्वदिच्छा सकाळी रेल्वेने निघाली. बोईसरवरुन विरार ट्रेन त्यानंतर अंधेरीला उतरत तिने फास्ट ट्रेनने कॉलेजला जात असल्याचं आपल्या नातेवाईंकांना फोनवरुन कळवलं. परिक्षा झाल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता फोन करते असा निरोपही तिने दिला होता. पण ती परीक्षेला आली नाही, असा फोन घरी आल्यावर साने कुटुंब हादरलं, त्यावेळी तिचा काहीच संपर्क होत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
स्वदिच्छाचे वडील मनिष साने यांनी म्हटलं होतं, "सीसीटीव्ही आणि पोलिसांच्या मदतीने तिच्या फोनचं शेवटचं लोकेशन बांद्रा बॅण्डस्टॅण्ड असल्याचं कळलं. त्यामुळे तिथे आम्ही स्थानिक मुंबई पोलिसांच्या मदतीने शोधाशोध सुरू केली."
बेपत्ता झालेल्या रात्री ती बॅण्डस्टॅण्डला होती हे तिथे सुरक्षा गस्त घालणाऱ्या जीवरक्षक मितू सिंह याच्या जबानीतूनही स्पष्ट झालं. 30 नोव्हेंबरच्या पहाटे या जीवरक्षकाने तिची विचारपूस केल्याचंही तपासात पुढे आलं.
त्यावेळी मितू सिंहने स्वदिच्छासोबत एक सेल्फी घेतला होता. तेव्हापासूनच पोलिसांना मितू सिंहवर संशय होता.
स्वदिच्छा साने बेपत्ता प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवून घेतला. या केसचा तपास बोईसर पोलीस तसंच मुंबई पोलीस आतापर्यंत करत होते. पुढे 23 डिसेंबर 2020 रोजी या केसचा तपास मुबई क्राईम ब्रॅंचकडे सोपवला जात असल्याची घोषणा तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी त्यावेळी हिवाळी अधिवेशनात केली होती.
IAS होण्याचं होतं स्वप्न
आपल्या मुलीच्या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवावा अशी इच्छा मनीष साने यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यावेळी व्यक्त केली होती.
मात्र, अशा प्रकारच्या प्रकरणांचा तपास अधिक वेगाने करण्यासाठी पोलिसांनी एफआयआर लवकर दाखल करून घ्यायला हवा होता, असंही त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
"स्वदिच्छा बेपत्ता झाल्यानंतर अपहरणाचा एफआयआर दाखल व्हायला दहा दिवस लागले. ही दिरंगाई टाळता आली असती," असं ते म्हणतात.
स्वदिच्छाच्या घरातल्या पहिल्या खोलीत गुणवंत विद्यार्थिनी म्हणून तिला मिळालेल्या पुरस्कारांच्या ट्रॉफी आहेत. तिचे वडील सतत त्याचा उल्लेख करतात. "ती सांगायची एमबीबीएस झाल्यानंतर रेडिओलॉजीत एमडी करायचंय आणि आयएएससाठी प्रयत्न करायचे आहेत. अगदी बेपत्ता व्हायच्या तीन दिवस आधी तिने सांगितलं की दोन वर्षानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी मी घेईन."
आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्याचं आणि आयएएस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी स्वदिच्छा त्या दिवशी परीक्षेला न पोहचता बॅण्डस्टॅण्डला कशी पोहचली हा प्रश्न तिच्या कुटुंबाला सतावत होता.
वृत्तवाहिनीला स्वदिच्छा सानेचे वडील मनीष साने यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हत्येची जी बातमी येतेय ती मला मीडियातून कळतेय. मला व्यक्तिश: याबद्दल पोलिसांकडून कोणतीच माहिती मिळालेली नाही. जर हत्या झाली आहे तर त्याचे पुरावे कुठे आहेत? तसंच, इतके दिवस मिठ्ठू सिंगला का पकडलं नाही? त्यासाठी कोणाचा दबाव होता का? आणि या मिठ्ठू सिंगला माझी मुलगी काही पहिल्यापासून ओळखत नाही. त्यामुळे माझा अजून तरी यावर विश्वास नाही. तिचं अपहरणही झालं असू शकतं. जोवर पोलीस अधिकृतरित्या याबद्दल मला काही सांगत नाही तोवर मी कशावर विश्वास ठेवू शकत नाही.” दरम्यान, आज (20 जानेवारी) सकाळपासून मुंबई पोलिसांचं एक पथक बँड स्टँड इथे बोटीने समुद्रात जाऊन तपास करत होते. मिठ्ठू सिंगने दिलेल्या माहितीनुसार पोलीस हा समुद्रात तपास करत होते असा कयास माध्यमांनी व्यक्त केला आहे. याला अजून पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.