हल्लाबोल'मुळे भाजप नैराश्यात; परिवर्तन नक्की घडणार - सुनील तटकरे
शनिवार, 7 एप्रिल 2018 (15:49 IST)
भाजप जगातील एक नंबरचा पक्ष आहे, असे भाजप म्हणत आहे. पण या जगातील एक नंबरच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हादरे बसू लागले आहेत. त्यांच्या स्थापना दिनाच्या महामेळाव्यातून हे स्पष्ट झाले आहे. भाजपने आमच्या आंदोलनाचा धसका घेतला आहे. भाजप हे नैराश्यातून करत आहे. आणि म्हणूनच परिवर्तन नक्की घडेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. आज #सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या २९ एप्रिल रोजी या टप्प्याची सांगता पुण्यात होईल. आदरणीय शरद पवार साहेब त्या आंदोलनाला उपस्थित राहतील. त्यानंतर #हल्लाबोल आंदोलानाचा पाचवा टप्पा #कोकण येथे काढला जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
भाजपने शिवसेनेशी युती करण्यात येणार असल्याचे संकेत काल दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 'हल्लाबोल'चे हे यश आहे. राष्ट्रवादीच्या तोफेसमोर हे कमकुवत पडणार आहेत, हे भाजपला माहिती आहे. म्हणून ते आता शिवसेनेसमोर पायघड्या घालत आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपची खिल्ली उडवली.भीमकाय हत्तीला एवढीशी मुंगी हैराण करू शकते. भाजप जर हत्ती असेल तर आम्ही मुंगीची भूमिका घेऊ आणि केव्हा कानात शिरायचे, हे आम्ही ठरवू. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणुकांसाठी सज्ज आहे, असे त्यांनी नमूद केले.
अनेक जण परतीच्या मार्गावर आहेत. त्यांच्याबाबत लवकरच निर्णय घेऊ आणि पत्रकारांना त्याबाबत कल्पना देऊ. सोलापुरात पक्ष बांधणीसाठी लवकरच बैठका लावल्या जातील. 'एनडीए'ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोडचिठ्ठी दिली आहे. ते संविधान रॅलीतही सहभागी झाले होते. त्यामुळे ते येत्या काळात आमच्या समविचारी पक्षांच्या आघाडीत सहभागी होतील, असे आम्हाला वाटते, असेही ते म्हणाले.
भाजपला ज्या लोकांनी मोठे केले, त्यांचा भाजपला विसर पडला. भाजपच्या कालच्या मेळाव्यातील बॅनरवर स्व. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हता, याचे दुखः वाटते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवणी, प्रमोद महाजन यांचेही फोटो नव्हते. जे स्वतःच्या नेत्यांविषयी प्रामाणिक नाहीत, ते जनतेशी प्रामाणिक कसे राहतील? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला.
भाजपला आता पराभव दिसू लागला आहे. विरोधी पक्षाला जनावराची उपमा देणे, हे काही योग्य नव्हते. भाजप खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. कारण भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असेही ते म्हणाले.यावेळी महिला प्रदेशाध्यक्षाचित्रा वाघ माजी आ. व जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे हे देखील उपस्थित होते.