अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारीला मुंबईत हल्लाबोल

शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (15:45 IST)

हल्लाबोल आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची सांगता झाली, त्या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत आझाद मैदान येथे हल्लाबोल आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी दिली. यावेळी पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक उपस्थित होते.

आज काँग्रेससोबत झालेल्या बैठकीत आगामी काळात एकत्रितपणे वाटचाल कशी करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर मतदार संघ निवडणुकांबाबतही रणनिती आखण्यासंबंधीत चर्चा झाली, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन पट्ट्यात पुढील हल्लाबोल आंदोलन दौरे होणार आहेत. या आंदोलनाबाबत रणनीती तयार करण्यासाठी २६ फेब्रुवारीला ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात तरूण वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळाला. सरकारविरोधी संतप्त प्रतिक्रिया जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपुढे व्यक्त केल्या. त्यांना सरकार दरबारी न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू. सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणार असल्याचा आभास निर्माण केला. दोन वर्षांपूर्वी मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्रच्या कार्यक्रमाचा गाजावाजा झाला. त्याद्वारे किती प्रकल्प राज्यात आले? त्यातून किती लोकांना रोजगार मिळाला? हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती