जनतेच्या पैशांची लूट सहन केली जाणार नाही : मोदी

शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (11:34 IST)
जनतेच्या पैशाची लूट सहन केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. 
 
पंजाब नॅशनल बँकेतील 11,400 कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर एका आठवड्यानंतर त्यांनी  या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा पैसा लुटणार्‍यांना सरकार माफ    करणार नाही. सरकार आर्थिक विषयांशी संबंधित अनियमिततेविरोधात मोठी कारवाई करत असून भविष्यातही करत राहणार आहे, असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. ग्लोबल बिजनेस समिटमध्ये  ते बोलत होते. पीएनबी घोटाळ्याचा त्यांनी प्रत्यक्ष उल्लेख केलेला नसला तरी याच मुद्द्यावर ते बोलल्याचे स्पष्ट होते.
 
त्याचबरोबर पंतप्रधानांनी नाव न घेता रिझर्व्ह बँकेलाही गर्भीत संदेश दिला. मोदी म्हणाले, विविध आर्थिक संस्था आणि संघटनांमध्ये नियम आणि नैतिकता तपासण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली आहे, त्यांनी पूर्ण निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देखील निरीक्षणसंस्था आणि लेखापालांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती