नाशिकमध्ये आमदार सुहास कांदे यांनी थेट पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याने त्यांची खदखद समोर आली आहे. बैठकींना बोलवले जात नाही, पक्षाच्या नियुक्त्या परस्पर केल्या जातात अश्या पद्धतीची भावना कांदे यांनी व्यक्त केल्याने जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.
मरेपर्यंत एकनाथराव संभाजी शिंदे या व्यक्तिसोबतच राहणार असे सांगतानाच आमदार कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. याआधी पालकमंत्री राहिलेले गिरीश महाजन, छगन भुजबळ यांनी नेहमी आपल्या पक्षाच्या आमदारांना सोबत घेऊनच जिल्ह्यातील कुठल्याही बैठका केल्याचा इतिहास आहे. परंतु, मला कुठल्याही बैठकीला आमंत्रितच केल जात नाही किंवा कळवलेही जात नाही त्यामुळे पालकमंत्र्यांच्या बैठकीला जाणे योग्य नाही म्हणून मी जात नाही असे म्हणत कांदे यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणारा मी कार्यकर्ता आहे. नगरविकास मंत्री किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हे तर एक व्यक्ति म्हणून माझ त्यांच्यावर प्रेम आहे. आणि त्या प्रेमाखातर मला मान अपमान सहन करावा लागेल, त्यासाठी मला दोन पाऊल मागे याव लागेल, त्यांच्यासाठी एमएलए काही त्याग करावा लागेल तरी माझी तयारी आहे. त्यांच्यावरील प्रेमापोटी हे सगळं सहन करण्याची तयारी ठेवतो. आणि माझ त्याच्यावरील हे प्रेम मरेपर्यंत टिकून राहील, असेही कांदे यावेळी म्हणाले. कांदे यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यासह राज्यातील राजकरणात खळबळ उडाली आहे. याआधी छगन भूजबळ पालकमंत्री असतानाही कांदे यांनी निधि वाटपावरून थेट भुजबळांना अंगावर घेतलं होत.