कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ; सांगलीला पुराचा धोका

शुक्रवार, 23 जुलै 2021 (16:02 IST)
सांगली संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम होता. चिपळूण,महाड,खेड,संगमेश्वर या भागांत पुराने वेढा घातला आहे.अनेक नद्या आणि धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळेअनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घरे, दुकाने पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशातच आता सांगलीतसुद्धा पुराचा धोका वाढला आहे. येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने सांगलीला पुराचा धोका असल्याची माहिती समोर येत आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले असून लोकांच्या घरातही पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
तर दुसरीकडे कोयना धरणातही तुफान पाऊस सुरू आहे. यामुळे धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून कोयना नदीत 10 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पुराचा धोका आहे.सातारा,महाबळेश्वर,कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या वतीने काही नागरिकांना स्थलांतरीत करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शेजारील कोल्हापुरातही पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठल्यानंतर शहरातील त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये पुराच पाणी घुसू लागले आहे. शहरातील शाहूपुरी भागातदेखील जयंती नाल्याचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले आहे. पन्हाळा मार्गावर अडकलेल्या 22 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. भुदरगड मार्गावरदेखील अडकलेल्या 11 प्रवाशांची सुटका करण्यात यश आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती