रायगडमध्ये दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू

शुक्रवार, 23 जुलै 2021 (15:16 IST)
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पोलादपुरातील सुतारवाडी गावात दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
रायगड जिल्हा माहिती कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार,
 
महाड तालुक्यातील आकले भोराव मध्ये जीवितहानी झालेली नाही, सर्व सुरक्षित आहेत. परंतु अंदाजे 20 गुरे वाहून गेलीत. नुकसान जास्त झाले आहे, कपडे,अन्नधान्य काहीच राहिले नाही.
महाड तालुक्यातील तळीये गावामध्ये काल रात्री दरड कोसळली होती. आज सकाळी येथे एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्याला सुरुवात झाली.
आतापर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखालून 36 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 30 ते 40 जण या ठिकाणी अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या दरडीखाली 30 ते 35 घरे दबल्याची भीती होती. मात्र पूरपरिस्थितीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने बचावकार्य सुरु करण्यात आले नव्हते. आज सकाळी पूराचे पाणी ओसरायला लागल्यानंतर लगेचच या ठिकाणी स्थानिकांच्या व एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील कोंडिवडे-पशुवैद्यकीय दवाखाना-2 यांच्या कार्यक्षेत्रातील सांगवी गावातील 4 खेचर, 17 बकऱ्या 2 वासरु, पाण्यात बूडून मृत्यूमुखी पडले आहेत.
या घटनास्थळी दहा ते बारा रुग्णवाहिका, तसंच एनडीआरएफची पथकंही इथं दाखल झाली आहेत.
 
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसंच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला.
 
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दरड कोसळण्याच्या दोन दुर्घटनेतील मृतांबाबत त्यांनी शोक व्यक्त केला. पोलिसांच्या माहितीनुसार, पाच लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर नौदलाचे जवान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हजर झाले आहेत. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील लोकांच्या मदतीसाठी नौदलाचे सात चमू रवाना झाले आहेत.
 
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या माहितीनुसार, एनडीआरएफच्या पथकाला या घटनेबाबत माहिती दिली आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात महाड तालुक्यात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास प्रशासनाला अडथळा येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. दुसरीकडे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे मदतची मागणी केलीय.
 
महाडमध्ये पावसाच्या पाण्यात अडकलेल्यांच्या मदतीसाठी लष्कराच्या मदतीची मागणी करण्यात आलीय. संजय मोहिते, पोलीस महानिरीक्षक, कोकण रेंज यांनी, "चिपळूण आणि महाडमधून पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. खेडमध्ये दरड कोसळण्याच्या तीन घटना निदर्शनास आल्या आहेत. याबाबत पुढील माहिती घेण्याचं काम सुरू आहे. महाड आणि चिपळूणमध्ये काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. रेस्क्यू करण्यात आलं", अशी माहिती दिली आहे.
 
'कोकणात कम्युनिकेशन आणि दळणवळण पूर्णपणे थांबलेलं आहे. माणगावहून पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, परंतु रस्त्यावर पाणी भरलेलं असल्याने पुढे जाता येत नाही! परिस्थिती पाहता, चिपळूणसह ज्या ज्या ठिकाणी जास्त पाणी भरलेलं आहे, तिथे वेळेत मदत पोहोचणं आवश्यक आहे.' असं ट्वीट विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती