सुभाष देसाई: 'माझ्या मुलाचे राजकारणात काहीच काम नाही, त्यामुळे ...'

सोमवार, 13 मार्च 2023 (23:36 IST)
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सुभाष देसाईंनी आपल्या मुलाच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया देताना म्हटले की त्याच्या जाण्याने शिवसेना (UBT) वर कुठलाही परिणाम होणार नाही.
 
13 मार्च रोजी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
 
उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
 
"आज भूषण देसाई यांचं शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो. मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय म्हणून वेगवेगळे कार्यकर्ते आमच्यासोबत येत आहेत", असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
 
दरम्यान, 'भूषण यांच्याशी आमचा काही संबंध नाही' असं शिवसेना नेते (UBT) आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
सुभाष देसाई काय म्हणाले?
मुलाच्या पक्षप्रवेशावर सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही.
 
त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.
 
शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही.
 
मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे.
 
सुभाष देसाई कोण आहेत?
सुभाष देसाई हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.
 
1990 मध्ये पहिल्यांदा सुभाष देसाई हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर 2004, 2009 मध्ये सलग दोनवेळा निवडणुकीत विजयी झाले. 2009 ते 2014 या दरम्यान शिवसेनेचे विधिमंडळनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर 2005 मध्ये शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली.
 
तसेच मागील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे उद्योगमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली होती. त्याच काळात मुंबईच्या पालकमंत्रिपदीही त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर 2015, 2016 मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची निवड झाली.
 
शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाशी निगडीत असे ज्येष्ठ नेते आहेत.
 
शिवसेनेचे मुंबईतले खासदार गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. खासदार गजानन किर्तीकर यांनी पुढील राजकीय प्रवासासाठी उद्धव ठाकरेंचा हात सोडून एकनाथ शिंदेंचा हात पकडला असला, तरी त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर हे मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहिले आहेत.
 
अमोल किर्तीकर हे युवासेनेचे सरचिटणीस आणि शिवसेनेचे उपनेते आहेत.
 
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती