कॉपी करू दिली नाही म्हणून परीक्षा विभागप्रमुखाला विद्यार्थ्यांनी केली बेदम मारहाण

सोमवार, 8 एप्रिल 2019 (18:23 IST)
अहमदनगर येथील शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील मारुतराव घुले महाविद्यालयात वार्षिक परीक्षा सुरु असताना कॉपी करु दिली नाही, या कारणावरुन परीक्षा विभागप्रमुख प्रा. महेश नामदेव शेजुळ (नेवासेफाटा) यांना सात विद्यार्थ्यांनी शुक्रवारी महाविद्यालयाच्या मैदानावर फायटर, चेनने मारहाण केली. याबाबत सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. दहिगाव ने येथील मारुतराव घुले महाविद्यालयात तृतीय वर्ष रसायनशास्त्र या विषयाच्या पेपरसाठी परीक्षा विभागप्रमुख म्हणून प्रा. शेजुळ काम पहात होते. परीक्षा सुरु असलेल्या ब्लॉक नंबर ८ मध्ये प्रा. संदीप नलवडे हे सुपरव्हीजन करत असलेल्या परीक्षा हॉलमध्ये एक विद्यार्थी मोबाइलच्या मदतीने कॉपी करत होता. 
 
शिक्षकांनी याबाबत प्रा. शेजूळ यांना माहिती दिली. प्रा. शेजूळ हे प्रा. नलवडे यांच्यासमवेत परीक्षा हॉलमध्ये गेले, तेव्हा पहिल्या रांगेतील विद्यार्थी ओंकार राजेंद्र काकडे मोबाइलमधून कॉपी करत असल्याचे त्यांना दिसले.त्याचा मोबाइल घेत कॉपी करु नकोस अशी समज त्याला देण्यात आली. काकडे याने मला कोणीही अडवू शकत नाही, असे म्हणत दमबाजी व शिवीगाळ केली. प्रा. शेजूळ यांनी त्याला वर्गाबाहेर काढले. पेपर संपल्यानंतर सर्व पेपर जमा करुन परीक्षा विभागाकडे प्रा. शेजूळ जात असता कबड्डी मैदानावर काकडे, अमोल रामाप्पा गिरम, पंढरीनाथ भिमराव कोल्हे, अभिजित कावले, शुभम जोशी, अक्षय अपशेटे, प्रसाद शिवाजी दळवी या सात जणांनी त्यांना फायटर, चेन व वायररोपने मारहाण व शिवीगाळ केली. प्रा. काकासाहेब घुले व लिपीक सोमनाथ नीळ यांनी त्यांना विद्यार्थ्यांच्या तावडीतून सोडवले. पोलिसांनी या सात जणांविरुध्द मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन मगर करत आहेत. दरम्यान, या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे. काॅपी बहाद्दरांवर लगाम लावतांना शिक्षक आता दहशतीखाली वावरत आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती