राज्यावर Delta Plus Variant संकट, पुन्हा लागू होणार कठोर निर्बंध?

गुरूवार, 24 जून 2021 (14:58 IST)
संपूर्ण राज्य कोरोनाशी लढा देत असताना आता डेल्टा प्लस विषाणूने सरकारच्या चिंतेत वाढ केली आहे. डेल्टा प्लसचा धोका पाहता आणि कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतची नियमावली जाहीर केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
 
या व्हेरिएंटचे देशभरात 40 रुग्ण तर राज्यामध्ये या विषाणूचे 21 रुग्ण आढळले आहेत. अर्थातच महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. तसंच बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी यामुळे पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे डेल्टा प्लसचा धोका पाहता आणि कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत कोरोनाबाबतचा आढावा घेण्यात आला.
 
काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यानुसार निर्बंध शिथिल करण्याच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यासोबतच दुकानांच्या वेळा पुन्हा कमी करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची ब्रेक द चेन यासाठी 20 दिवसांपूर्वी राज्य सरकारनं अनलॉकचा निर्णय घेतला होता. मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. राज्यात आतापर्यंत या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळलेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचा इशारा केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी करणं हे आरोग्य प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे. कारण महाराष्ट्रात येत्या तीन- चार आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डेल्टा प्लस विषाणूबद्दल माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले एकूण 21 रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक 9 रुग्ण रत्नागिरीत तर जळगावमध्ये 7 रुग्ण आहेत. मुंबईमध्ये 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाण्यामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती