कोविडच्या नियमांचं योग्य पालन न केल्यास एक ते दोन महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती टास्क फोर्सनं व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवश्यक औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत कोरोना व्हायरसचा डेल्टा प्लस व्हेरिएंट शिरकाव करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागानुसार पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या खूपच जास्त होती. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेतही रुग्णांची संख्या जास्त असण्याची शक्यता जास्त आहे.
कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेत राज्यात सुमारे 19 लाख आणि दुसऱ्या लाटेत सुमारे 40 लाख रुग्णांची नोंद झाली. तसंच तिसऱ्या लाटेत कोरोनाचे 8 लाख सक्रिय रूग्णही दिसू शकतात, ज्यांपैकी त्यात दहा टक्के मुलांचा समावेश असू शकतो, असं आरोग्य अधिकाऱ्यानं म्हटलं आहे .
कोविड 19 च्या तिसर्या लाटेसाठी तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत आरोग्य विभागानं संभाव्य परिस्थिती मांडली. बैठकीत संभाव्य औषधे, त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, आरटीपीसीआर कीट, मास्क, पीपीई किट्स अशा बाबींवर विस्तृत चर्चा झाली.