त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरू असलेले व्हीआयपी पेड दर्शन बंद करा

मंगळवार, 28 मार्च 2023 (20:36 IST)
नाशिक 
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरू असलेले व्हीआयपी पेड दर्शन बंद करावे. तसेच दान पेट्या तात्काळ हलवाव्यात असा आदेश भारतीय पुरातत्त्व विभागाच्या छत्रपती संभाजीनगर पुरातत्त्व कार्यालयाने त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थानला पत्राद्वारे दिला आहे.
 
त्र्यंबकेश्वरयेथील मंदिराला भारतीय पुरातत्त्व विभागाचे डी.एस.दानवे, दीपक चौधरी आणि सुपरिटेंडिंग आर्कियॉलॉजिस्ट यांच्या समितीने १५ मार्च रोजी भेट देऊन पाहणी केली होती. या पाहणीमध्ये त्यांना आढळलेल्या काही बाबींबाबत १६ मार्च रोजी त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थानच्या अध्यक्षांना पत्र पाठविण्यात आले असून या पत्राद्वारे संस्थानला काही आदेश देण्यात आले आहेत.
 
पुरातत्व विभागाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर देवस्थान हे केंद्रीय संरक्षित स्मारक असल्यामुळे येथे सुरू करण्यात आलेले व्हीआयपी पेड दर्शन चुकीचे असून ते प्राचीन स्मारके आणि पुरातत्वस्थळे आणि अवशेष कायद्याच्या तरतुदींच्या विरोधात आहे. त्यामुळे ते तात्काळ बंद करावे, असा आदेश दिला आहे.
 
पुरातत्व विभागाने पुढे पत्रात म्हटले की, महाशिवरात्री उत्सवानिमित्त मंदिर परिसरात तात्पुरते चालणारे/मोबाईल वॉक वे आता स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रातून काढून टाकण्यात यावेत. तसेच मंदिर परिसरात विविध ठिकाणी दानपेट्या ठेवण्यात आल्या असून त्या बेकायदेशीर आहेत. त्यामुळे त्या दानपेट्या तात्काळ हटवाव्यात, अशा सूचनाही पुरातत्व विभागाने देवस्थान संस्थानला दिल्या आहेत.
 
दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिरात  सुरु करण्यात आलेल्या पेड दर्शनाबाबत उच्च न्यायालयात  याचिका प्रलंबित असून न्यायालयाकडून याबाबत न्याय मिळेल अशी खात्री असल्याचे देवस्थानच्या विश्वस्तांनी म्हटले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती