अवैध बांधकामाबद्दल शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांचा 18 कोटीचा दंड माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 18 कोटींचा दंड आ. सरनाईक यांच्याकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणीही डॉ. सोमय्या यांनी आपल्या याचिकेत केली आहे.
ठाणे येथील छाबय्या विहंग गार्डन इमारतीतील बेकायदा बांधकामाबद्दल आ. सरनाईक यांच्या कंपनीला ठाणे महापालिकेने दंड ठोठावला होता. हा दंड माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. ज्या महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना (एमआरटीपी) कायद्यानुसार आ. सरनाईक यांना दंड ठोठावण्यात आला होता, त्या कायद्यात दंड माफ करण्याची तरतूदच नसल्याने राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय पूर्णतः बेकायदा आहे, या कायद्यानुसार आ. सरनाईक यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकार आणि ठाणे महापालिकेला द्यावेत , अशी विनंतीही डॉ. सोमय्या यांनी आपल्या याचिकेत केली आहे.