राज्यात चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मालिकांच्या चित्रीकरणाला शासनाने परवानगी दिली असली तरी याविषयीच्या नियमांबाबत निर्मात्यांच्या मनात गोंधळ आहे. त्यामुळे हा उद्योग पूर्ववत सुरु व्हायला आणखी काही काळ लागू शकतो. सुरुवातीला लहान लहान चित्रपटांचं काम करुन मग नियमांचं पालन करीतच चित्रीकरण सुरु करण्याचा बहुतेकांचा विचार असल्याची प्रतिक्रीया वृत्तसंस्थेनं केलेल्या पाहणीत अनेकांनी व्यक्त केली आहे.
नवीन दिशानिर्देशांनुसार केवळ ३३% कर्मचारी कामावर बोलावून चित्रीकरण सुरु करता येईल. डॉक्टर्स, परिचारिका, ताप मोजणी यंत्र, रुग्णवाहिका इत्यादी बाळगणं अनिवार्य आहे. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अभिनेत्यांना सेटवर जाता येणार नाही. अनेक निर्बंध शिथिल करण्याची मागणी करणारं पत्र निर्माता संघटनेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलं आहे.