एसटी संपामुळे आणखी एका कर्मचाऱ्याने जीव गमावला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल आगारात चालक म्हणून कार्यरत असलेल्या शिवाजी पाटील यांनी सोमवारी दुपारी रेल्वेखाली जीवन संपवलं. शिवाजी पंडित पाटील असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. एसटी संपामुळे पाटील गेल्या काही दिवसांपासून काळजीत होते. त्यातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.
शिवाजी पाटील तीन दिवसांपूर्वी जळगावात राहणाऱ्या बहिणीकडे आले होते. एसटी संपामुळे पगार मिळत नाही म्हणून आर्थिक परिस्थिती बेताचं झाल्याचं त्यांनी बहिणीला सांगितलं होतं. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. पोलिसांनी ती ताब्यात घेतली. शिवाजी हे मूळचे यावलचे. स्वत:ची शेती नाही, हक्काचं घर नाही अशी त्यांची स्थिती होती. पगार नसल्याने ते घरभाडंही भरू शकले नव्हते.