याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शंकर झुंबरराव धनवटे (वय 85, रा. कलानगर, जेलरोड, नाशिकरोड) व आरोपी मिलिंद आनंद बच्छाव (वय 52) व हर्षल मिलिंद बच्छाव (वय 32, दोघेही रा. किशन सोसायटी, सायखेडा रोड, नाशिकरोड) हे एकमेकांच्या ओळखीचे असून, एकमेकांचे मित्र आहेत.
मिलिंद बच्छाव हे सूरज इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, तर हर्षल बच्छाव हा कॉन्ट्रॅक्टर आहे. दरम्यान, आरोपी बच्छाव बापलेकाने सन 2016 ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत फिर्यादी शंकर धनवटे यांना भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असल्याने आरोपी बच्छाव यांनी धनवटे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भागीदारीतील व्यवसायासाठी बच्छाव बापलेकाने धनवटे यांच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम, तसेच आरटीजीएसद्वारे काही रक्कम अशी एकूण 1 कोटी 59 लाख 16 हजार 550 रुपयांची रक्कम स्वीकारली.
ही रक्कम घेऊन त्याद्वारे होणाऱ्या व्यवसायातून व्यावसायिक वाहने खरेदी केली व सरकारी ठेके मिळवून त्यासाठी फिर्यादी धनवटे यांनी दिलेल्या पैशांचा वापर केला. त्याचप्रमाणे साक्षीदार संजय एस. निमगुलकर व आरोपी मिलिंद बच्छाव यांनी सन 2012 मध्ये बांधकामाचा व्यवसाय करण्याचे ठरवून तो व्यवसाय सुरू केला. या कालावधीत त्यांनी रस्त्यांची बांधकामे केली. साधारण 2016 ते 2017 च्या सुमारास फिर्यादी धनवटे व निमगुलकर यांची भेट झाली. ते दोघेही वर्गमित्र असून, त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
हा प्रकार किशन सोसायटी, सायखेडा रोड व द्वारका येथील निवृत्ती कॉम्प्लेक्स येथे घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मिलिंद बच्छाव व हर्षद बच्छाव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.