शिवतीर्थावरील मनसेच्या बैठकीत ‘जय श्रीराम’चा नारा

मंगळवार, 19 एप्रिल 2022 (15:11 IST)
राज ठाकरेंनी गुढी पाडव्याला घेतलेली सभा त्यावर सर्वपक्षीय राजकारण्यांनी केलेल्या टीका-टिपण्ण्या आणि त्यांनतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी घेतलेली उत्तरसभा यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. राज यांनी सभेदरम्यान मशिदीवरील भोंगे उतरवण्यावरून आपली भूमिका मांडली होती आणि यासाठी ३ मेचा अल्टिमेटम दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अयोध्या दौऱ्यासाठी जोरदार तयारी करा तसेच अक्षय तृतीयेला राज्यभर महाआरती करा असे आदेश राज यांनी या बैठकीत नेत्यांना दिल्याचे समजत आहे.

या बैठकीस बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, गजानन काळे, शिरीष सावंत उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या मुंबईतल्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. तसेच या बैठकीत राज्यातल्या मशिदीवरील भोंगे तीन मेपर्यंत उतरवले गेले पाहिजेत असा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून राज्य सरकारला दिला होता. या संदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजत आहे.

तसेच ५ जून ला होणाऱ्या अयोध्या दौऱ्याविषयी राज यांनी नेत्यांना सूचना दिल्या. अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी करा. तसेच अक्षय तृतीयेला राज्यभरात सर्वत्र महाआरतीचे आयोजन करा, असा आदेशही यावेळी राज यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना दिला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी ५ जून ला अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी बैठकीत महत्वाच्या विषयांवर खलबंतं पार पडली. तसेच अयोध्याच्या दौऱ्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी केली जात आहे. तसेच अयोध्येचा दौरा मोठा करण्यासाठी मनसेच्या वतीने १० ते १२ रेल्वे गाड्या बूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी राज ठाकरे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे  यांना पत्र लिहिणार असल्याचं बोललं जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती