सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 जुलै पर्यंत हवामान खात्यामार्फत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत ते जिल्हास्तरावरील यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. त्यासाठी तालुकावार तहसिलदार यांच्या नेतृत्वाखाली व्हाट्सअँप ग्रुप निर्माण करण्यात आले आहेत . यामार्फत माहितीची देवाण-घेवाण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सावंतवाडी उपविभागातील अधिकाऱ्यांची आपत्कालीन व्यवस्थेबाबत शुक्रवारी सावंतवाडी तहसील कार्यालयात बैठक झाली. यावेळी त्यांनी आपत्कालीन व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर ,तहसिलदार श्रीधर पाटील, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते. के . मंजूलक्ष्मी म्हणाल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली.
या संदर्भात शासकीय यंत्रणेने आवश्यक खबरदारी घेतली. पूर परिस्थिती असलेल्या गावातील नागरिकांना अन्य ठिकाणी हलवण्यात आले . शासकीय यंत्रणा पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी होती. त्यामुळे जिल्ह्यात मोठी हानी झाली नाही. नुकसान झालेल्या अपघातांना भरपाई देण्याचे काम तसेच पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. असे स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 जुलै पर्यंत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे शासकीय यंत्रणा सतर्क आहेत नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे असे आवाहन केले .
भूस्खलन होणाऱ्या संभाव्य झोळंबे ,तुळस ,रंबळ, शिरशिंगे या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. अन्य ठिकाणी भूस्खलन होणाऱ्या संभाव्य ठिकाणी शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे असे स्पष्ट केले.