धक्कादायक! एकाच मोजणी रजिस्टर नंबरचे आढळले दोन दस्तऐवज; राज्य सरकारने घेतला हा निर्णय

मंगळवार, 15 मार्च 2022 (21:14 IST)
राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीमध्ये गट नंबर ३१४/१ आणि ३१४/३ मध्ये बांधकाम सुरु असून संबंधित विकासकाने सादर केलेल्या दस्तऐवजात फेरफार असल्याचे तथ्य आढळून आले आहे. एकाच मोजणी रजिस्टर नंबरचे दोन दस्तऐवज संबंधितांनी नगरपरिषदेला दिले असून ही गंभीर बाब असल्याने या प्रकरणाची तपासणी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले जातील, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले.
 
विधानसभेत दिलीप मोहिते-पाटील, ॲड.अशोक पवार, डॉ. किरण लहामटे या सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले की, राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीमध्ये गट नंबर ३१४/१ आणि ३१४/३ मध्ये बांधकाम सुरु असून त्याच्या १२०० चौरस मीटर क्षेत्रफळाची मोजणी २०१३ मध्ये करण्यात आली होती. या मोजणीची नक्कल २०१६ ला भूमी अभिलेखकडून मिळवली त्यात २४०० चौरस मीटर क्षेत्रफळाची नोंदणी केलेली आहे. या प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरु असून अहवालानंतर कठोर कारवाई करण्यात येईल. या विकासकाला नगरपरिषदेने दिलेली बांधकाम परवानगी रद्द केली असून या आदेशाला विकासकाने न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. चुकीच्या नक्कल, सनद देखील रद्द केल्या असून त्याविरोधात संबंधित विकासक न्यायालयात गेला आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले.खोटे दस्तऐवज तयार करुन एकाच क्रमांकाचे दोन दस्तऐवज नगरपालिकेला देणे ही गंभीर बाब असून भूमि अभिलेख उपसंचालकांना हे तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यासंदर्भात अधिकची कागदपत्रे निदर्शनास आली तर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले जातील, असेही राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती