जालना परिसरात अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका मंदिरात मुलीच्या लग्नाची तयारी करण्यात आली होती. पण लग्नापूर्वीच अर्धा एकर जमीन मुलीच्या नावे करण्याची मागणी काकांनी केली आणि सगळेच बिनसले. जमीन नावावर करण्यास नकार मिळाल्यानंतर संतापलेल्या वडील व काकांनी मुलीला मंडपातून ओढत घरी आणले. बदनामी झाल्याच्या रागातून त्या दोघांनी मुलीच्या गळ्याला दोर बांधून घराजवळच्या लिंबाच्या झाडावर लटकवले. दोघांनीच सरण रचून तिचा मृतदेहही जाळला आणि राख दोन पोत्यात भरून ठेवली. हृदय पिळवटून टाकणारी ही ऑनर किलिंगची घटना जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव येथे उघडकीस आली आहे.
सूर्यकला संतोष सरोदे असे मयत मुलीचे नाव आहे तर संतोष भाऊराव सरोदे व नामदेव भाऊराव सरोदे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सूर्यकला ही संतोषची तिसरी मुलगी होती. ती सध्या अकरावीत शिकत होती. चुलत आत्याच्या मुलाचे व तिचे प्रेम जुळले. दोघेही घरातून निघून गेले होते; मात्र घरच्यांनी त्यांना लग्न करून देतो, असे सांगून पुन्हा घरी बोलावले. मंगळवारी एका मंदिरात त्यांनी दोन्ही कुटुंबांना लग्नासाठी बोलावून घेतले. त्यावेळी मुलीच्या काकाने अर्धा एकर शेती मुलीच्या नावावर करण्याची मागणी केली. त्याला नकार मिळाल्याने वडिलांसह काकाने सूर्यकलाला मंडपातून ओढत घरी आणले. घराच्या उंबऱ्याजवळच असलेल्या लिंबाच्या झाडाला लटकावून फाशी देऊन ठार केले. घरापासून हाकेच्या अंतरावरच सरण रचून मृतदेह जाळून टाकला. दोन गोण्यांमध्ये राखही भरून ठेवली. त्या गोण्या गुरुवारीही तेथेच दिसून आल्या. ज्या ठिकाणी मृतदेह जाळला होता, तेथे रांगोळी काढल्याचेही दिसून आले.
वाचवण्याचा प्रयत्न का झाला नाही?
सूर्यकला सरोदे हिच्या घरात शांतता दिसून आली. गावातील काही मंडळी भेटण्यासाठी येत होती. तिची आई घरात होती. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तर बहिणीसह घरातील लहान मुले बाहेर बसलेली होती. घटनेच्या वेळी घरातील काही मंडळी हजर होती; परंतु कोणीही तिला वाचविण्याचा प्रयत्न का केला नाही, असा प्रश्न गावात चर्चिला जात आहे. दरम्यान, संतोष सरोदे व नामदेव सरोदे या दोघांनाही गुरुवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.