नागपुरात सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा वर्ष 2020 -2021 चा लेखा परीक्षणाचा अहवाल व अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात मिळणाऱ्या लाडवाचा प्रसाद नित्कृष्ट असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. या अहवालामुळे विठ्ठल मंदिर समितीचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.
मंदिर समिती स्वतः लाडवाचा प्रसाद तयार करून विक्रीस ठेवते. लाडूच्या पाकिटावर घटकांची नोंदी नाही, शेंगदाण्याच्या तेल ऐवजी सरकीच्या तेलाचा वापर केला जातो. तीन लाडूच्या पाकिटांची किंमत 20 रुपये ठेवण्यात आली आहे.हे लाडू भाविकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. बचत गटा बरोबर मंदिर समिती देखील तितकीच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या मागे जो कोणी आहे अद्याप त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. या वर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शेळके म्हणाले, राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागा कडून प्रसाद प्रमाणित केला जात असून या मधील त्रुटींना अहवालात नोंदवले आहे. आता यापुढे कोणतीही तक्रार येणार नाही.