सचिन वाझे आणि शिवसेना यांच्यावर संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया

शनिवार, 6 मार्च 2021 (16:07 IST)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांचा साठा सापडलेल्या प्रकरणात महत्वाचा दुवा असणारे मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सचिन वाझे यांनी २००८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता त्यामुळे संशय निर्माण झाल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, “मला तसं वाटत नाही. मी त्याच्याविषयी फार बोलणं योग्य नाही. एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन असं बोलणं मला योग्य वाटत नाही”.
 
“जर उपस्थित केलेले प्रश्न योग्य, मुद्देसूल असतील आणि त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या याबाबतही लोकांच्या मनात शंका आहे. ती शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. त्याच्या मृत्यूचं भांडवल करु नये. कारण ती निरपराध व्यक्त्ती आहे. त्याचा बळी कोणत्या कारणामुळे गेला आहे? त्याला कोण जबाबदार आहे? या सगळ्या गोष्टींबाबतचं सत्य जितक्या लवकर गृहखातं समोर आणेल तितकं हे या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती