'बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली'-राज ठाकरे

रविवार, 24 जुलै 2022 (10:09 IST)
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली. शिवसेना फुटीला दुसरं कोणतंच कारण नाही," असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केलं.
 
राज ठाकरे म्हणाले, "बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली. याला दुसरं कोणतंच कारण नाही. तुमची वागणूक, सगळ्या गोष्टी पैशात मोजायच्या, पैशात तोलायच्या. पक्षाकडे बघायचं नाही, लक्ष द्यायचं नाही. आजही सगळे लोक काय सांगत आहेत?"
 
"लोक म्हणतात आज जे सुरू आहे त्यात उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळत आहे. मला हे कळालं नाही. यात सहानुभूतीचा काय संबंध?" असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
 
"शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा होता आणि तो पक्ष बाळासाहेबांसोबत गेला. आताच्या शिवसेनेत बाळासाहेबांचा विचारही नाही. आजच्या पक्षप्रमुखांच्या अंगावर मराठी किंवा हिंदुत्वाच्या नावाने एक खटला तरी दाखल आहे का? त्या विषयावर मोर्चा काढला, आंदोलन केलं असं काहीच नाही. त्यांची इतकी भाषणं ऐकलीत तर बाळासाहेबांच्या तोंडातील दोन-चार वाक्य सोडली तर त्यांनी काय हिंदुत्व मांडलंय मला सांगावं," असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती