आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरु झाला आहे. राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा ठाकरे गटाकडून शिंदे गटाने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. परवा सायंकाळी दापोलीत त्याचा प्रत्यय आला. असे असताना आता शिवसेनाभवन कोणाच्या ताब्यात जाणार? य़ावरून चर्चा रंगली आहे.
शिवसेना ज्यांची त्यांचे शिवसेना भवन असणार आहे. कारण शिवसेना भवन हे शिवसेनेचे प्रतिक आणि नावावर आहे. ते पक्षाचे मुख्यालय आहे. यामुळे शिंदे गट शिवसेना, धनुष्यबाणानंतर आता शिवसेना भवनावरही दावा सांगणार असल्याची शक्यता आहे. तसे वेगवेगळ्या पक्षांचे नेते बोलत होते. परंतू शिंदे गटाने याबाबत खुलासा केला आहे.
शिवसेना भवन ही केवळ इमारत नाही, तर आमच्यासाठी मंदिर आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना भवनावर कधीही दावा करणार नाही. ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मनातले विचार अत्यंत चुकीचे आहेत. जेव्हा-जेव्हा आम्ही शिवसेना भवनाजवळून जाऊ, तेव्हा तेव्हा शिवसेना भवनसमोर आम्ही नतमस्तक होऊ. आमच्या अनेक आठवणी शिवसेना भवनाशी जुळलेल्या आहेत. बाळासाहेबांबरोबर अनेक बैठका आमच्या त्या ठिकाणी झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यावर कधीही दावा सांगणार नाही, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor