पत्राचाळ घोटाळ्यात शरद पवारांचाही सहभाग? ईडीने केला आरोपपत्रात उल्लेख

मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (21:23 IST)
पत्राचाळ घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. ते माजी मुख्यमंत्री म्हणजे शरद पवार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय तत्कालिन कृषी मंत्रीही जबाबदार असल्याच्या वार्तेने राज्यात खळबळ उडाली आहे.
 
पत्राचाळ घोटाळ्यात रोज नवीन खुलासे होत आहेत. ईडीने त्यांच्या आरोपपत्रातून आणखी दोन धक्कादायक गोष्टी समोर ठेवल्या आहेत. यामध्ये सन २००६ च्या दरम्यानच्या काळात एका तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती.

विशेष म्हणजे या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते, अशीही माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणामध्ये खूप काही घडामोडी घडत होत्या, त्यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना माहिती होती, असे देखील सांगण्यात आले आहे. परंतु संजय राऊत यांनी ही माहिती गुप्तच ठेवली, असेही म्हटले जात आहे.
 
तेव्हा केवळ संजय राऊत यांनीच हे प्रकरण हाताळले नाही तर त्यामागे अनेक राजकीय दिग्गजांचा हात होता का ? असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यापैकी यात एका माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कृषिमंत्र्याचा उल्लेख होतो आहे, मग तो माजी मुख्यमंत्री कोण होता, की ज्याच्या नेतृत्वाखाली बैठक झाली, त्याचा उल्लेख मात्र ईडीने आरोपपत्रात केलेला नाही. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
ईडीने आपल्या आरोपपत्रात खुलासा केला आहे की, पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लाँड्रिंग केली आहे. पत्रा चाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे. चाळीत राहणाऱ्या ६७२ भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला होता. म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने एचडीआयएलच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील या सर्व भाडेकरूंना सदनिका देऊन तीन हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. यात गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती