शरद पवारांचा कानमंत्र : बदल्याची भानगड नको; प्रलोभनांपासून दूर राहा

गुरूवार, 9 जानेवारी 2020 (12:18 IST)
सत्तेत आल्यामुळे लोकांची कामे करा. आणखी दहा वर्षे सत्ता कशी टिकेल या दृष्टीने विचार करा. बदल्यांच्या भानगडीत पडू नका. कोणत्याही प्रलोभनांपासून दूर राहा, असा कानमंत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांना दिला असल्याने सूत्रांनी सांगितले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या अध्क्षतेखाली ही बैठक पार पडली. सुमारे तीन तास ही बैठक चालली. या बैठकीत मंत्र्यांनी काम करावे आणि काय करू नये यावर मार्गदर्शन करण्यात आले. भाजप हा प्रबळ विरोधी पक्ष आहे. त्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोणतीही चुकीची गोष्ट करू नका. पक्षाची आणि स्वतःची प्रतिमा जपा, असा कानमंत्रही या बैठकीत देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
जनतेची जास्तीत जास्त कामे करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीतील दोन्ही मित्रपक्षांशी समन्वय 
साधण्याबाबतही या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशासकीय यंत्रणा, मंत्रालयीन कामकाज आणि पक्षवाढी संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर आपापल्या जिल्ह्यात सर्व पालकमंत्र्यांनी काय काय केले पाहिजे, याची जंत्रीही या मंत्र्यांना देण्यात आली. तुम्हाला अडकवण्यासाठी सापळाही रचला जाऊ शकतो. त्यासाठी प्रलोभने दिली जाऊ शकतात. अशा प्रलोभनांना बळी पडू नका, असा कानमंत्रही देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अडचणी उद्‌भवल्यास अनुभवी आणि वरिष्ठ मत्र्यांशी चर्चा करण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आल्याचे समजते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती