पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे अर्थात तात्या मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. “अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद म्हटले की, पुणे लोकसभा लढवण्याची माझी इच्छा आहे. परंतु मनसेमध्ये चार जणांचीही लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांच्यापैकी एकाला तिकीट द्यावे आणि निवडून आणावे. कारण मी आता परतीचे दोर कापले आहेत, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आज त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
वसंत मोरे यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या कार्यालयात शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे ते शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांना पत्रकार परिषदेत वसंत मोरेंबाबत प्रश्न करण्यात आला. यावर ते म्हणाले की, तुम्ही मला आता भेटलात त्याचा खुलासा करायचा असतो का? मला कोणीही भेटलं म्हणून खुलासा करत बसू का? असे प्रश्न उपस्थित करत राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच त्यांनी काय करावं याबाबतही चर्चा झाली नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.