मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्यादिवशी शिवतीर्थावर झालेल्या झंझावाती सभेचे सध्या मीडिया आणि सोशल मीडियावरून विश्र्लेषण सुरू आहे. त्यातून आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणाचा रोख, त्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात घेतलेली रोखठोक भूमिका आणि राज्यातील इतर पक्षांबाबत घेतलेली मवाळ भूमिका विचारात घेता राज्यात नव्या समीकरणांची मांडणी होताना दिसत आहे. त्यातही राज ठाकरे यांची शरद पवार यांच्याशी वाढलेली जवळीक विचारात घेता महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत मराठी+मराठा असे समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे.
सध्याची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय सोय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकत्र येण्याचा निर्णय घेऊ शकतात. एकीकडे मनसेने मराठी अस्मितेचा मुद्दा अधिक प्रखर केला आहे. राज परप्रांतीयांचे लोंढे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुजराती प्रेम यावरून आक्रमक भूमिका घेत आहेत. या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा मिळाला आहे. राज यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीचे आवाहन केले आहे. तरीही त्यांचे शिवसेनेशी असलेले भाऊबंदकीचे संबंध आणि काँग्रेसची परप्रांतीयांबाबतची भूमिका पाहता ते या दोघांशी निवडणुकपूर्व युती करण्याची शक्यता कमीच आहे. त्यापेक्षा आघाडी करायचीच असल्यास राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणे त्यांच्यासाठी तसे सोयीस्कर आहे. राष्ट्रवादीचा मुंबईत फार प्रभाव नसला तरी त्यांची मते मनसे उमेदवारांसाठी महत्त्वाची ठरू शकतात.
दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र या आघाडीत होणारा जागावाटपाचा तिढा आणि काँग्रेससमोर घ्यावी लागणारी दुय्यम भूमिका यामुळे पवार काँग्रेससोबत आघाडी करण्यास फारसे इच्छुक नसतात. केवळ नाईलाजाने त्यांचा पक्ष आघाडीमध्ये सहभागी असतो. अशा परिस्थितीत मनसे हा आघाडीसाठीचा राष्ट्रवादी काँग्रेससमोरील उत्तम पर्याय ठरतो. त्याची कारणे म्हणजे शरद पवार हे राष्ट्रीय नेते असले तरी त्यांच्या पक्षाचा विस्तार हा बहुतकरून महाराष्ट्रापुरताच आहे. त्यामुळे मनसेसोबत गेल्याने परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे राजकीय नुकसान होण्याची शक्यता नाही. राज यांनी हिंदुत्वाचा मुद्दाही उचललेला नसल्याने पवारांच्या पुरोगामी राजकारणालाही बाधा येणारी नाही. एकंदरीत या सर्वांमुळे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यास ती दोन्ही पक्षांसाठी पूरक ठरण्याची शक्यता आहे.
आता या दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यास त्यांच्याध्ये जागावाटपावरूनही तिढा होण्याची शक्यता नाही. कारण दोन्ही पक्षांची प्रभावक्षेत्रे वेगळी आहेत. एकीकडे मनसेचा प्रभाव हा मुंबई आणि महाराष्ट्रातील अन्य शहरी भागात आहे, तर राष्ट्रवादीचे प्रभाव क्षेत्र ग्रामीण भाग, शेतकरी आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजात आहे. त्यामुळे शहरात राज ठाकरेंचे मराठी कार्ड आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे मराठा कार्ड अशी मतांची गोळाबेरीज करून विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा पटकवायच्या अशी कल्पना शरद पवार यांच्या डोक्यात असू शकते. त्यानंतरही बहुताचा आकडादूर राहिल्यास भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस किंवा मसेनेचा पाठिंबा घेण्याचा मार्ग त्यांच्यासोर असेल. त्यामुळे मराठी+मराठा हे समीकरण सध्यातरी चर्चेचा आणि शक्याशक्यतेचा विषय असला तरी ही आघाडी प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता कुणीही नाकारू शकत नाही.