परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वरपुडकर यांचा पक्षप्रवेश पार पडला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वरपुडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सहकार क्षेत्रातील योगदान आणि सामाजिक कार्यामुळे चार दशकांपासून परभणी जिल्ह्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारे वरपुडकर यांच्या आगमनाने पक्ष संघटना अधिक मजबूत होईल.
यावेळी चव्हाण म्हणाले की, सुरेश वरपुडकर हे सामाजिक बांधिलकीने काम करणारे व्यक्तिमत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारत आणि महाराष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यावर विश्वास ठेवून हे सर्वजण भाजपमध्ये सामील झाले आहेत.
अनुभवी वरपुडकर यांच्या आगमनाने परभणी जिल्ह्यात भाजप संघटन अधिक मजबूत होईल. पक्षात सामील होणाऱ्या सर्वांचा आदर राखला जाईल, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री अतुल सावे, परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार संजय केणेकर, आमदार विक्रांत पाटील, माधवी नाईक, मराठवाडा विभाग संघटन मंत्री संजय कोडगे, अमर राजूरकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, परभणी महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
वरपुडकर यांच्यासह परभणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, परभणीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धोनीराम चव्हाण, माजी पंचायत समिती सभापती तुकाराम वाघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका प्रेरणा वरपुडकर, माजी समाजकल्याण सभापती द्वारकाबाई कांबळे, कृषी उपबाजार समितीचे माजी सभापती आंबाराम चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष आशिष पाटील आदी उपस्थित होते. माजी पंचायत समिती उपाध्यक्ष रामेश्वर कटिंग, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर लाड, दिलीपराव साबळे आदींनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Edited By - Priya Dixit