कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे निधन

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते  आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम (७३) यांचे निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. 
 
गेल्या काही दिवसांपासून पतंगरावांवर लीलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, पतंगरावांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचा चांगला नेता हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
 
 
पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय : 
 
- १९४५ मध्ये सांगली जिल्ह्यातील सोनसळ येथे एका लहान शेतकरी कुटुंबात डॉ. पतंगराव कदम यांचा जन्म झाला.
 
- पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात वने, मदत आणि भूकंप पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. सहकार, शिक्षण क्षेत्रात ते नेहमीच अग्रेसर राहिले.
 
- विधानसभेवर ते सहा वेळा निवडून आले होते.
 
- १९६४ साली वयाच्या २०व्या वर्षी त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली.
 
- भारती विद्यापीठाचे ते संस्थापक-कुलपती होते. ‘भारती विद्यापीठ’ युनिव्हर्सिटी, पुणे या त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या देश आणि परदेशामध्ये १८० शाखा असून  ही भारतातील नामवंत आणि अग्रेसर संस्थांपैकी एक मानली जाते.
 
- सोनहिरा सहकारी कारखाना लि. वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी आणि कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लि. पलूस, जि. सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड बँक अशा अनेक सहकारी संस्थांचे ते संस्थापक आहेत.
 
- नवी दिल्ली आणि दुबई येथे त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि संगणक व्यवस्थापन महाविद्यालये देखील स्थापन केली आहेत.
 
- त्यांच्या या सेवेची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यांनी त्यांना सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल ‘मानवता सेवा अवॉर्ड’ने गौरविले होते. तसेच मराठा सेवा संघाकडून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील केलेल्या कामगिरीबद्दल ‘मराठा विश्वभूषण’ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा ‘एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन’ तसेच शहाजीराव पुरस्कार, कोल्हापुरातील उद्योग भूषण पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती