लग्नानंतर दुसरी रात्र जेलमध्ये

मंगळवार, 29 मार्च 2022 (11:39 IST)
अंबाजोगाई- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका विचित्र घटनेत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाला पोलिसांनी अटक केली आहे. खरं म्हणजे हळदी समारंभात केलेलं कृत्य नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे. लग्नाच्या मस्तीत नवरदेवाने बंदूकीने हवेत गोळीबार केला आहे. नंतर संबंधित कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री अंबाजोगाईतील केज रस्त्यावर असलेल्या एका मंगल कार्यालयात बालाची भास्कर चाटे (साकूड, ता. अंबाजोगाई) या तरुणाचा हळदी समारंभाचा कार्यक्रम पार पडत असाताना तेथे शेकडो लोकांच्या हजेरीत सोहळा थाटामाटात सुरु होता. नंतर हळदी समारंभ पार पडल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास बालाजीने आपल्या मित्रांसोबत बेधुंद होऊन डान्स केला आणि आनंदाच्या भरात बालाजीच्या काही मित्रांनी स्वत: जवळील बंदूक काढून हवेत गोळीबार केला आहे. 
 
बालाजीने हातात बंदूक घेत हवेत फायरींग केली. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला गेला आणि अवघ्या काही तासांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंबाजोगाई पोलिसांनी नवरदेव बालाजी चाटेसह, शेख बाबा आणि इतर तीन जणांवर गुन्हा दाखल केला.
 
या घटनेचा पुढील तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती