दिवाळीपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही, दिवाळीनंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यातील विधानभवन सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अजित पवारांनी ही माहिती दिली.
‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’, या अभियानाला पुणेकरांनी साथ द्यावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटपही केले.
बैठकीत अजित पवार म्हणाले की, पुण्यामध्ये डिसेंबर, जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, हा अंदाज खोटा ठरवण्यासाठी जबाबदारीने वागा. तसेच कोरोनाला लाईटली घेऊ नका, काहीजण हनुवटीच्या खाली मास्क लावतात, ‘नो मास्क’ च्या दंडाच्या माध्यमातून 12.5 कोटी जमा झाले आहेत. पुणेकरांनो हे बरं नाही असंही अजित पवार म्हणाले.