सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी पर्यायी रस्ता तयार केला जाणार

बुधवार, 11 जानेवारी 2017 (14:51 IST)
साडेतीन पीठापैकी अर्धपीठ असलेल्यी सप्तशृंगी देवीच्या गडावरील एकेरी वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी रस्ता तयार केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याविषयी कळवण उपविभाग सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश मिळाला आहे. त्यानुसार सप्तश्रृंगी गड येथे चंडिकापूर मार्गे पर्यायी घाट रस्त्याचे सर्वेक्षण सुरू होणार आहे. या पर्यायी मार्गामुळे या ठिकाणी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. सप्तश्रृंगी गडावर जाण्यासाठी सध्या एकच रस्ता असून, या रस्त्यावर नेहमी अपघात होतात. एकच रस्ता असल्याने दरड कोसळल्यानंतर तो बंद ठेवला जातो. त्यामुळे श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट न्यासाच्या अध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त उन्मेष गायधनी, राजेंद्र सूर्यवंशी व मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सप्तश्रृंगी गड विकास कार्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
 
हा प्रस्ताव सप्टेंबर २०१६ या कालावधीत दिल्ली येथे सादर केला होता, त्यात पर्यायी रस्त्याचाही समावेश होता. या प्रस्तावात संपूर्ण परिसराला सुरक्षा कवच उपलब्ध करून देणे, सार्वजनिक वाहन व्यवस्था सक्षम करून येणार्‍या भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणे, आदी विषयांचा समावेश होता. या सर्वेक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच नाशिक पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक यांना पाठवलेल्या पत्रात पर्यायी घाट रस्ता निर्मिती बाबतचा लेखी खुलासा केला आहे. त्यासाठी खासगी सर्वेक्षण कंपनीला जबाबदारी दिल्याचे कळवण सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा