संजयकाकांनी उसाची बिले थकविली; शेतकऱ्यांनी कारखान्यांना लावले टाळे

शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (22:19 IST)
खासदार संजयकाका पाटील यांच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडीच्या आणि तासगाव तालुक्यातील तुरचीच्या अशा दोन्ही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसबिले अद्याप दिलेली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी काल शुक्रवारी दुपारी तुरचीच्या तासगाव कारखान्याच्या अकाउंट आणि शेती विभागालाच टाळे लावले. अखेर कारखाना प्रशासनाने नमते घेत सोमवारी ऊस बिलाचे धनादेश दिले जातील असे आश्वासन दिल्यानंतर टाळे खोलून आंदोलन मागे घेण्यात आले.
 
भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी आपल्या या दोन्ही कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्याआधी शेतकऱ्यांना भरभरून आश्वासने दिली होती. चांगला दर देण्याचे सांगितल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून बहुसंख्य शेतकऱ्यांनी या कारखान्यांना आपला ऊस दिला. मात्र गळीत हंगाम संपत आला तरी ९ महिने उलटूनही शेतकऱ्यांना त्यांचे ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत. स्वतः संजयकाका आणि कारखाना प्रशासन शेतकऱ्यांना टाळू लागले. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आक्रमक होत हे टाळे ठोक आंदोलन केले.
 
शेतकऱ्यांनी १० ऑक्टोबरला बिलाचे धनादेश देण्याची मागणी केली पण कारखाना प्रशासन ३० ऑक्टोबरवर अडून बसले. कारखान्यावर कार्यकारी संचालक पाटील यांनीही हे शेतकऱ्यांकडे कानाडोळा केला. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी दोन्ही विभागाला टाळे ठोकले. मग मात्र प्रशासनाने सोमवारीच धनादेश काढू असे म्हणत नमते. त्यामुळे शेतकरीही शांत झाले आणि त्यांनी आंदोलन समाप्त केले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती