राज्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. गावातील एका तरुणाने गावातील मुलींच्या शाळेत दहावीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओ बनवला. या घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास तिच्या वडिलांना मारण्याची धमकीही त्याने दिली. व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करून तो तिला वारंवार इतर मैत्रिणींशी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता.
या सर्व गोष्टींना कंटाळून अल्पवयीन मुलीने घरातील लोखंडी छताच्या बारला गळफास घेऊन आत्महत्या केली. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे पोलिसांनी घटनेची माहिती न घेता दिवसभर गुन्हा नोंदवला नाही. रात्री उशिरा गुन्हा दाखल होईपर्यंत गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीमध्ये शिकणारी ही मुलगी कुटुंबासोबत शेतात राहत होती. गावातील शाळेत जाताना तिला चार तरुण त्रास देत होते. ज्यामध्ये राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात आणि अनिल नाना काळे अशी त्या आरोपींची नावे आहेत. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. राजू गेंड तिच्याकडून शरीर सुखाची मागणी करत होता. परंतु तिने त्याला अनेकदा धुडकावून लावले. नंतर राजू गेंड याने जबरदस्तीने तिला गावातील एका खोलीवर नेऊन बलात्कार केला. ही सर्व अत्याचाराची घटना तिच्या बहिणीच्या समोरच घडली होती. या घटनेचा व्हिडिओही बनवला गेला होता. नंतर तो व्हिडीओचा धाक दाखवून तिला त्रास देत असे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असूनही, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाही, म्हणून आज गावकऱ्यांनी स्वतः चार आरोपींपैकी दोघांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे आणि तो गावात दहशत निर्माण करतो कारण त्याचा राजकीय प्रभाव आहे. पोलिसांनी स्वतः आरोपींना पकडण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत म्हणून ग्रामस्थ संतापले.
या प्रकरणाबाबत भाजप महिला नेत्या नीता केळकर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात पोहोचून पोलिसांवर टीका केली आणि त्यानंतर आरोपींविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, अनिल नाना काळे, रोहित सर्जेराव खरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी राजू गेंड आणि रामदास गायकवाड यांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आणि अटक केली. उर्वरित दोन आरोपी अजूनही फरार आहेत. गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींना काहीतरी दाखवून ब्लॅकमेल करणे, त्यांचा अशा प्रकारे फायदा घेणे आणि त्यांचे व्हिडिओ बनवणे हे ग्रामीण भागात सामान्य होत चालले आहे. आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील मुख्य आरोपीने यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत.