भाजप सत्तेचा गैरवापर करून बळजबरीने आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करत आहे. शिक्षण, माध्यम, कायदा, पोलीस प्रशासन अशा विविध श्रेत्रांमध्ये आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहे. पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. राज्यातील सनदी अधिकारी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे काम करत आहे असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील पाटील यांनी केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा शनिवारी पिंपळेगुरव येथील निळू फुले नाट्य मंदिरात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना कोते पाटील बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक नाना काटे, पंकज भालेकर, श्याम लांडे, विक्रांत लांडे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, नगरसेविका संगीता ताम्हाणे, सिनेट सदस्य अभिषेक बोके, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात युवक संघटनेची मजबूत बांधणी सुरू आहे. शहरात देखील संघटना चांगली काम करत आहे. या संघटनेच्या जोरावरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईल असे संग्राम कोते पाटील म्हणाले. आता खऱ्या अर्थाने संघर्षाची वेळ आली आहे. कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरावे. सरकारची चुकीची कामे जनतेला सांगणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काढलेल्या हल्लाबोल आंदोलनाला विदर्भात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या प्रतिसादाचे मतात रुपांतर झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच या परिसराचा विकास अजित पवार यांच्यामुळेच झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.