सोलापुरात ईदगाह बाहेर पाकिस्तानी फुग्यांची विक्री; सूत्रधारांना अटक

शुक्रवार, 30 जून 2023 (08:53 IST)
ईदनिमित्त ईदगाह मैदानावर समूहिक नमाज अदा झाल्यानंतर ईदगाहाबाहेर बालबच्च्यांसाठी खरेदी केले जाणारे फुगे चक्क पाकिस्तानी असल्याचे आढळून आले. ‘ लव्ह पाकिस्तान ‘ या मजकुरासह पाकिस्तानी ध्वज छापलेले फुग्यांची विक्री होताना मुस्लीम बांधवांनी वेळीच जागरूकता दाखविली.,फुगे विकणा-या संबंधित दोन व्यक्तींना ताब्यात पोलिसांच्या हवाली केले.
 
अजय अमन पवार व शिवाजी लक्ष्मण पवार (रा. पारधी वस्ती, विजापूर रोड, सोलापूर) अशी फुगे विकणा-यांची नावे आहेत. या दोघांनी ज्या विक्रेत्याकडून हे पाकिस्तानी फुगे खरेदी केले, त्या व्यापा-याचाही शोध घेण्यात आला असून त्याचे नाव तन्वीर बागवान असे आहे.एरव्ही, अडाणी, अशिक्षित असलेले हे अजय आणि शिवाजी हे पारधी समाजाचे फुगेवाले मधला मारूती परिसरात फुगे विकतात, अशी माहिती समोर आली आहे. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस कसून चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फुगे विक्री करणारा व्यापारी तन्वीर बागवान याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. या तिघांविरूध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिंदू-मुस्लीम धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या आणि हिंदू-मुस्लीम एकोपा नष्ट करण्याच्या उद्देशाने भारतीय नागरिकांच्या सार्वभौमत्वाचा अवमान केल्याचा आरोप या तिघा आरोपींवर ठेवण्यात आला आहे. तन्वीर बागवान याचे मधला मारूती परिसरात न्यू रोशन खिलौना हाऊस नावाचे दुकान आहे. या दुकानात पाकिस्तानी फुग्यांचा साठा करून विक्री केली जात होती. 
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती