आदिवासी भागातील मुलांची विक्री ; नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (20:32 IST)
आदिवासी भागातील नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्यावर अशी वेळ का आली याबाबत सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आज विधान परिषदेच्या उप सभापती ना. डॉ. नीलम गोर्‍हे यांनी आज दिले. त्यांच्या कार्यालयातून आज याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांकडून माहिती घेण्यात आली. नाशिक जिल्हाधिकारी श्री. डी. गंगाधरन आणि पोलिस अधीक्षक श्री. सचिन पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधण्यात आला. तसेच नाशिक आदिवासी विकास विभागाचे आयुक्त श्री. हिरालाल हिरामणी आणि अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली. याविषयी पोलिस यंत्रणेकडून योग्य तो अहवाल सादर करण्यात येईल असे पोलिस अधिक्षक यांनी कळविले आहे.
 
नासिक आणि अहमदनगर भागातील आदिवासी पालकांनी आपल्या पोटाच्या मुलांना पैशाच्या गरजेपोटी विकल्याची धक्कादायक बातमी नुकतीच काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची त्वरीत दखल घेऊन डॉ. नीलम गोर्‍हे यांनी यांची दखल घेतली. अशा प्रकारच्या घटना घडवून आणणारे कोणी समाजकंटक नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत की काय याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अशा प्रकारच्या घटना आदिवासी भागात पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी आदिवासी कुटुंबांना शाश्वत स्वरूपाचा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी गांभीर्याने प्रयत्न आदिवासी विकास विभागाने करावा अशी सूचना यावेळी त्यांनी केली आहे.
 
राज्य सरकारने नुकतेच नीती आयोगाच्या धर्तीवर राज्य सल्लागार समितिची स्थापना करणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण कृषि, आरोग्य आणि रोजगार विषयक काम करण्यात येणार असून त्याचा आढावा मुख्यमंत्री स्तरावरून घेण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यभरातील आदिवासी कुटुंबांचा या पार्श्वभूमीवर रोजगार, शिक्षण, कृषि विकास आदि मुद्द्यांवर प्राधान्याने विचार करण्याची सूचना डॉ. गोर्‍हे यांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती